कोरोनासारख्या महासंकटाचा सामना करण्यासाठी अवघा देश एकवटला आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी आर्थिक मदत करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ असून जे काही त्यासाठी गरजेचे आहे ते सगळे केले पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…. असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे. दरम्यान पंतप्रधान केअर फंडसाठी आपण छोट्यात छोटी रक्कमही दान म्हणून स्वीकारत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगत मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होतं. आपल्या पुढील भविष्यातील पिढ्यांसाठी भारताला निरोगी आणि समृद्ध बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुयात असेही त्यांनी आपल्या म्हटले होते.
फक्त अक्षय कुमारच नव्हे तर कोरोनाविरोधातील लढाईत मदतीसाठी हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनी देखील पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी हृतिक रोशनने एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर पंतप्रधान मदत निधीमध्ये कपिल शर्माने ५० लाख रुपयांची रक्कम दान केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने देखील 51 लाखांची मदत केली आहे.