अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते ट्विटरवर आपल्या फॉलोअर्ससाठी वेगवेगळी माहिती, व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र आता चक्क याच कारणामुळे त्यांच्या फोनमधून व्हॉट्सअॅप डिलीट करण्यात यावे यासाठी ट्विटर युजरने ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत लिहिले आहे की, एक मेगास्टार आणि प्रख्यात उद्योगपती बनावट बातम्यां आणि विचित्र सामग्रीस बळी पडत आहेत आणि हे सर्व त्याना व्हॉट्सअॅपद्वारे मिळत आहे. आपल्याला या दोन सज्जनांचा सन्मान परत आणायचा आहे.
विशेष म्हणजे याद्वारे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला त्यांच्या नंबरवरील व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मागील महिन्यात दोनदा अमिताभ बच्चन फेक न्यूजला बळी पडले होते. त्यांनी जनता कर्फ्यूचा संबंध अमावस्येशी जोडला होता. तसेच टाळ्या वाजवणे, ताट वाजवणे कोरोना व्हायरसशी लढण्यास मदत करते असे म्हटले होते.
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले होते. तसेच कोरोना व्हायरस मनुष्याच्या मलमुत्रात अनेक आठवडे राहत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
या संदर्भात त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करण्याची याचिका दाखल होताच ट्विटरवर “Uninstall Whatsapp” ट्रेडिंग होऊ लागले. आतापर्यंत या ऑनलाईन याचिकेवर 700 जणांनी सही केली आहे. मात्र अद्याप अमिताभ बच्चन यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.