लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसकडून चिंतन केले जात आहे, कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला नसल्याचा सूर उमटला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काही जागांवर आघाडी पाळली नाही हे सत्य असल्याचं म्हंटले आहे.

     लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये आता खुद्द प्रदेशाध्यक्षांनीचं दुजोरा दिल्याने दोन्ही कॉंग्रेसमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक काळात आणि आता मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या कॉंग्रेस आमदारांवर कारवाई करणार का ? असे विचारले असता, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं चुकीचं नाही. मतदारसंघातील कामांसाठी भेट होत असते. त्यामुळे कोणावरही कारवाई करणार नसल्याचं ते म्हणाले.

दिल्लीतून विधानसभेचे उमेदवार लादू नका, कॉंग्रेस नेत्यांची मागणी

     दरम्यान, कॉंग्रेसच्या बैठकीत विधनासभा निवडणुकीत दिल्ली वा मुंबईतून उमेदवार न लादता स्थानिकांना एकमताने उमेदवार निश्चित करू द्यावे, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येत आहे, त्यामुळे कॉंग्रेसने देखील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करावे, अशी मागणी देखील कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.


Find out more: