विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजप-शिवसेनेकडून पळवापळवा सुरू असतानाच; पुण्यातील शिवसेनेचे एक माजी आमदारही राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. पक्षाकडून वारंवार डावलण्यात येत असल्याने नाराज असलेल्या या आमदारांकडून चाचपणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा आमदार “शिवबंधन’ तोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याने त्याची चर्चा दोन्ही पक्षात रंगली आहे.

महापालिका तसेच लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला शहरात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाकडून शहरात संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. हे बदल सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. ही मंडळी पक्षातील कार्यक्रमांनाही दांडी मारतत आहेत.

पक्षात घुसमट होत असल्याने काही नाराज निष्ठावान कार्यकर्ते “शिवबंधन’ तोडून राष्ट्रवादीच्या गोटात सामील होण्यासाठी तयार झाले आहेत. त्यांना भाजपचा पर्याय असला, तरी विधानसभेसाठी युती निश्‍चित असल्याची चर्चा असल्याने भाजपमध्ये गेल्यास आणखी त्रास होईल, या शक्‍यतेने या नाराजांकडून राष्ट्रवादीचा पर्याय चाचपला जात आहे.

तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी “निवडणुकीपूर्वी पक्षाला गरज पडल्यास बाहेरून उमेदवार “आयात’ करावे लागतील,’ असे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पुण्यातील नाराजांना राष्ट्रवादीचे दरवाजे काही प्रमाणात उघडे झाले असून “विधानसभेसाठी वर्णी लावण्यासाठी या नाराजांकडून आमच्याकडे चाचपणी सुरू आहे,’ असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.                              


Find out more: