कोल्हापूर : राज्य सरकार पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळतंय की काय असा प्रश्न आहे. कारण पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत.
शासनाकडून प्रत्येक पूरग्रस्तांना दहा किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मदतकार्य सुरु झालं आहे. पण भाजपकडून मदतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
इचलकरंजी शहरांमध्ये पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पूरग्रस्तांमध्ये संताप आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे धान्य वाटप करण्यात येणार आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव, आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे शहरांमध्ये संतापाची लाट आहे.
बापाच्या घरातून देताय का? – राजू शेट्टी
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
“सरकार जी मदत करतंय ते काही उपकार करत नाही. जी मदत देताय ती तुमच्या बापाच्या घरातून देताय का? या पाकिटांवर फोटो लावत आहेत, आता कमळ तेवढं लावायचं राहिलं आहे. पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल तर स्वत:च्या खिशातली त्या आणि त्यावर तुमचे फोटो चिटकवा. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळू नका”, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही भाजप केवळ चमकोगिरी करत असल्याचा आरोप केला. “काल गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओ असा किंवा स्टिकर चिटकवणे असो, भाजपच्या नेत्यांची असंवेदनशीलता दिसून येते. भाजप केवळ राजकारण करत आहे”, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.