हे सरकार संवेदनशील नाही – सुप्रिया सुळे
दौंड – कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून या पुरग्रस्तांना मदत करावी. मात्र, मंत्री गिरीश महाजन हे पूरस्थितीची पाहणी करण्याकरता गेल्यावर पूरग्रस्तांची विचारपूस करण्याऐवजी सेल्फी काढण्यात मग्न असल्याची टीका करीत हे सरकार संवेदनशील नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड शहरातील पानसरे वस्ती, खाटिक, वडार गल्ली, नदीकाठच्या घरांना पुराचा फटका बसला होता. यामध्ये जवळपास 450 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली होती. या पूरग्रस्त भागाची पाहणी रविवारी (दि. 11) खासदार सुळे यांनी केली आणि येथील पूरग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समितीचे सभापती ताराबाई देवकाते, महसूल नायब तहसीलदार स्वाती नरोटे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, दौंड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार उपस्थित होते.