कर्जत – सामाजिक कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून कर्जत, जामखेड तालुक्यात सक्रिय झालेले युवा नेते रोहित पवार हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. साधी राहणी, मोकळेपणाने संवाद साधण्याची शैली आणि सामान्य माणसापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची तळमळ ही युवकांना भावत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार सक्रिय झाले असून त्यांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच हजारो युवकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले असल्याने तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे.
गावागावात काम करणारे कार्यकर्ते त्याचबरोबर सामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे या कार्यपद्धतीचा अवलंब तालुक्यात अपवादानेच झाला. रोहित पवारांची कर्जत तालुक्यातील एन्ट्री ही टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याची मोहीम राबवून झाली. दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला शासकीय यंत्रणेपेक्षाही तत्पर सेवा त्यांच्या माध्यमातून मिळाली. पुढे अंधांना चष्म्याचे वाटप, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती, शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, पूरग्रस्त भागातील जनतेचे प्रश्न, कर्जत शहरात राबविलेले स्वच्छता अभियान अशा एक ना अनेक उपक्रम व घटनांतून त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
साधे राहणीमान, जनतेबद्दल वाटणारी आपुलकी व प्रेम, सर्व वयोगटातील लोकांमध्ये तेवढ्याच नम्रतेने मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे त्यांनी युवकांची मने जिंकून घेतली आहेत. मोठा डामडौल व भपकेबाज पद्धतीचा अवलंब करून अहंकारात अडकून पडलेल्या पुढाऱ्यांना मात्र यातून मोठी चपराक बसली आहे. भविष्यात त्यांच्याशी राजकीय स्पर्धा करणाऱ्या उमेदवाराला ग्राऊंड लेव्हलवर काम केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
गावागावातील मोजक्या लोकांना हाताशी धरून राजकीय गणिते आखणाऱ्या नेत्यांना आता आपली कार्यपद्धती बदलल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण प्रत्येक पुढाऱ्याची तुलना ही आता पवारांच्या कार्यशैलीशी केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत व आपल्या यंत्रणेमार्फत थेट जनतेपर्यंत पोहोचत विजय खेचून आणला. सध्या रोहित पवार यांनीही थेट जनतेशी संवाद साधत आपला झंझावात निर्माण केला आहे.
त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त पहिल्या फळीतील नेतेच आता राजकारणाला दिशा देणार नसून जागृत झालेली जनता व सक्रिय कार्यकर्तेच आता निवडणूक हाती घेणार असल्याचे चित्र दिसत आहे. विखे आणि पवार यांच्या एन्ट्रीमुळे कर्जत तालुक्यातील राजकारणाला मात्र शिस्त लागत आहे. गावागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ मिळत असल्याने ते अधिक सक्रिय होत आहेत. कार्यकर्तेच सक्रिय झाल्याने गावपुढाऱ्यांचे महत्त्व मात्र कमी होत आहे.