आंबेवाडी येथील मारुती मंदीर येथे पूरग्रस्तांशी खा. पवार यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर म्हणाले, पुरामुळे बाधित झालेली मातीची घरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून द्यावीत.
खा. पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर खा. पवार यांनी आंबेवाडीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे मग तिथे जायला काय अडचण आहे ,अशी विचारणा केली. तेव्हा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वीज नाही, प्रॉपर्टी कार्डला नावे लागलेली नाहीत. अशा विविध कारणांमुळे स्थलांतर झाले नसल्याचे सांगितले. यावर खा. पवार यांनी तुमची तेथे राहायला जायची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे याबाबत मागणी करु, असे सांगितले.
ऊसाच्या स्थितीबाबतही पवार यांनी विचारणा केल्यावर येथील बहुतांश सर्वच ऊस पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर ऊरलेल्या ऊसाबाबत आडसाळी लागवडीबाबत काय करता येईल, याच्या मार्गदर्शनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या तज्ज्ञांच्या दहा टीम येथे येणार आहे. तसेच ४० हजार एकरात तयार केलेल्या ऊसाच्या बियाणाचाही वापर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. तुम्ही एकटे नसून सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहे. त्यामुळे धीर सोडू नका, पुन्हा उभारा अशा शब्दात दिलासा दिला.