परळी : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात भाजपतर्फे गुरुवारी (ता. 15) खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने काढलेल्या फेरीत 11 लाख 25हजार रुपयांची मदत जमा झाली. रक्षाबंधनाच्या ओवाळणीची रक्कमही त्यांनी पुरग्रस्तांना दिली.शहरातील हमाल, मापाडी, रिक्षा चालक, व्यापारी, विक्रेते व वृद्धांनी पुरग्रस्तांप्रती संवेदनशीलतेचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत दिली.
फेरी दरम्यान वैद्यनाथ बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एका दिवसाचे वेतन मदत म्हणून तर भेल सेकंडरी इंग्लिश स्कुल, शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्था या संस्थांनी ही मदतीचे धनादेश खासदार डॉ. मुंडे यांच्याकडे जमा केले. निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्हा सतत दुष्काळाशी सामना करत आहे. जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीने जरी ग्रासले असले तरी जनतेच्या मनात मायेचा ओलावा कायम असल्याचे यातून दिसते अशी भवान डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.