कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी दिल्लीत महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतली. त्या भेटीत महाराष्ट्रातील पूरस्थितीवर चर्चा झाली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आणि मुझफ्फर हुसेन या पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षांनी सोनियांची भेट घेतली. त्यांनी पूरस्थितीची माहिती सोनियांना दिली. त्या भेटीवेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल हेही उपस्थित होते. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळेही सोनिया यांनी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी केलेल्या चर्चेला महत्व आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची देशभरात नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढील अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत पक्षाची धुरा हंगामी स्वरूपात सोनियांकडे सोपवण्यात आली आहे.
त्याआधी पुत्र राहुल यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी असताना सोनिया यांनी सक्रियता कमी केली होती. त्यामागे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचेही कारण होते. मात्र, पक्षाला सावरण्यासाठी त्या पुन्हा सरसावल्या आहेत. पक्षनेत्यांच्या भेटी, चर्चा या माध्यमातूून त्या ऍक्शनमध्ये परतल्याचे मानले जात आहे.