घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात. काँग्रेसच्या बाबतीत काहीसे असेच झाले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून पराभव झाल्यानंतर पक्षाचीही एकही गोष्ट अनुकूल होत नाहीय. आधी पक्षाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला, त्यानंतर गोव्यासारख्या राज्यात निवडून आलेल्या आमदारांनी पक्षांतर केले, संजय सिंह आणि भुवनेश्वर कलीता यांच्यासारख्या नेत्यांनी राजीनामा दिला आणि मग कर्नाटकसारख्या राज्यात सत्ता गेली. आता तर हरियाणा या उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यातही काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.
हरियाणा राज्यात पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथे मिळणारे संकेत पक्ष नेतृत्वाला आणखी चिंतित करणारे आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी पक्ष नेतृत्वावर तोफ डागली असून काँग्रेस पक्ष आपल्या मार्गावरून भरकटला आहे, अशी टीका केली आहे. आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मिरबाबतच्या कलम 370 रद्द करण्यावरूनही त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे.
रविवारी भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी रोहतक येथे एक सभा आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले. येथेच त्यांनी बंडखोरीचा पवित्राही घेतला. ‘जेव्हा सरकार काही चांगले करते तेव्हा मी त्याचे समर्थन करतो. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी कलम 370 हटविण्याचेस विरोध केला. माझा पक्ष मार्गावरून भरकटला आहे. आधी असलेली काँग्रेस ही नाही. स्वाभिमान व देशभक्तीची जेव्हा बाब येते तेव्हा मी तडजोड करू शकत नाही,’ असे ते म्हणाले. हुड्डा हे हरियाणा कॉंग्रेसचे सर्वात मोठे नेते असून ते कॉंग्रेसशी गेल्या चार दशकांपासून जोडलेले आहेत. ते दोन वेळा मुख्यमंत्री होते तर चार वेळा खासदार होते. अशा प्रकारे बंडखोरीचा पवित्रा घेण्याचा त्यांची ही पहिलीच वेळ आहे.
रोहतकमधील सभेत हुड्डा यांनी ज्या प्रकारे आपल्याच पक्षावर तोफ डागली त्यावरून विधानसभा निवडणुकीपूर्वी ते नवीन पक्ष बनवणार, या अटकळींना बळ मिळाले आहे. किंबहुना रोहतकच्या सभेतच ते याची घोषणा करतील, अशीही चर्चा होती. मात्र ते घडले नाही. याचे कारण हुड्डा यांची कदाचित दबावाची रणनीती असावी. राज्यात आपल्याला मोकळीक दिली नाही आणि पक्षाची सूत्रे आपल्या हातात दिली नाहीत तर आपण वेगळा रस्ता निवडू शकतो, हा संदेश त्यांनी यातून दिल्याचे मानले जात आहे.
कॉंग्रेसच्या 12 पैकी 10 आमदारांनी तसेच अनेक माजी खासदार आणि आमदारांनी या सभेला हजेरी लावली होती. गंमत म्हणजे हरियाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला ला लक्ष्य करण्यापेक्षा हुड्डा यांनी स्वपक्षालाच जास्त धारेवर धरले होते.
हरियाणा काँग्रेसला गटबाजी नवीन नाही. हरियाणा काँग्रेसमध्ये किमान पाच गट असून राजकीय ताकदीच्या बाबतीत हुड्डा गट सर्वात शक्तिशाली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक तंवर आणि भूपेंद्रसिंह हुड्डा हे एकमेकांचे कट्टर विरोधी मानले जातात. मात्र यावेळी हुड्डा यांनी रोहतकमधील परिवर्तन रॅलीसाठी केवळ आपल्या लोकांना बोलावले. दुसऱ्या गटातील लोकांना त्यांनी साधे निमंत्रणही दिले नाही. ‘परिवर्तन महारॅली’ नावाच्या या सभेत राज्यातील किंवा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एकाही नेत्याला बोलावणे नव्हते. तंवर यांच्याकडे राज्य काँग्रेसची सूत्रे जाण्यास हुड्डा यांचा विरोध आहे, मात्र त्यांचा विरोध डावलून माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना हटवले नाही.
हुड्डा यांना सोनिया गांधींनी 2005 ते 2014 पर्यंत प्रदेश काँग्रेसचे प्रमुख केले होते आणि भजनलाल यांना डावलले होते. मात्र हुड्डा यांनी 2016 मध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार आर. के. आनंद यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून सोनिया व हुड्डा यांचे संबंध तणावाचे आहेत.
दुसरीकडे, अशोक तंवर यांना आपल्या पक्ष सहकाऱ्यांचा विश्वास प्राप्त करण्यात अपयशी आले आहे. तंवर यांनी 2009 मध्ये पहिली निवडणूक लढविली होती. सिरसा लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांना हरियाणा कॉंग्रेसचे प्रमुख करण्यात आले. मात्र त्यानंतर हरियाणा कॉंग्रेसने सर्व निवडणुका गमावल्या आहेत. कॉंग्रेसने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रोहतकची केवळ एक जागा जिंकली. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा अभूतपूर्व पराभव झाला आणि ती तिसऱ्या स्थानी फेकली गेली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व दहा मतदारसंघांवर भाजपने कब्जा केला. भूपिंदर हूडा आणि त्यांचे चिरंजीव व तीन वेळचे खासदार दीपेंद्र हूडादेखील अनुक्रमे सोनीपत आणि रोहतकच्या गडामध्ये हरले होते.
आता पक्ष नेतृत्वहीन झाला असल्याचे कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हुड्डा यांच्यासारखे नेते पुढे येऊन बंडखोरी करत आहेत. आता सोनिया त्यातून कशी वाट काढतात, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.