कुरकुंभ – कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर येथील कंपन्यांचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभाग, सांडपाणी शुद्धिकरण केंद्र, औद्योगिक महामंडळ यासह संबंधित विभाग व ग्रामस्थ यांची दोन महिन्यांतून एकदा संयुक्‍त बैठक घेत सुरक्षित कामाबाबत शिस्त लावणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे सोमवार (दि.19) कुरकुंभ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी सवांद साधला. सुळे यांना सांगितले की, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील जल व वायू प्रदूषण, आग तसेच स्फोटांच्या घटनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी एमआयडीसीकडे फिरकत नाहीत. बहुतांश कंपनीचे अधिकारी दुर्घटनांबद्दल चुकीची माहिती देतात अशा अनेक तक्रारींची मालीका ग्रामस्थांनी खासदार सुळे यांच्या समोर वाचली. यातून मार्ग काढण्यासाठी संयुक्‍त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी अभ्यासपूर्ण माहिती घेऊन, जवळ पुरावे ठेवून त्या बैठकीत मांडा, म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आवाहन सुळे यांनी केले.

याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले, पांढरेवाडीचे सरपंच छाया झगडे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


Find out more: