बदनापूर: शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरी सभा जालना जिल्ह्यातील बदनापूरयेथे संपन्न झाली. यावेळी सभेला संबोधित करताना विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी भाजप शिवसेना सरकारच्या अनियोजीत कारभाराचा पाढा वाचला. गेली पाच वर्षे या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. आघाडी सरकार गेलं आणि मराठवाड्याला कुणी वाली उरला नाही.

शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे दिले गेले नाही, सरसकट कर्जमाफी कागदावरच राहिली, दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे नियोजन झाले नाही, अशा परिस्थितीत जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर लोकांसाठी काय करत आहेत? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.

आज राज्यात प्रशासकीय कामकाज नियोजीत नाही, या सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही, सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी कधी नव्हे तो संपावर गेला, असा आरोप पवार यांनी केला.

पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करण्याची दानत नाही, पण भाजप-शिवसेना सरकारला फसवेगीरी करायला जमतं, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याची, मुंबईत अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची, सरसकट कर्जमाफी करण्याची केवळ आश्वासने देतं. एकीकडे हे भाजपा सरकारने गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारले, पण अजूनपर्यंत अरबी समुद्रातील शिवस्मारक का बांधून झाले नाही, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश देणाऱ्या आणि पारदर्शकतेचा बिगुल वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणते राजकारण आहे, याचे उत्तर द्यावे, असेही मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रातील जनता पुरात बुडाली असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढत होते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नौटंकी करत व्हीडिओ काढत होते. अशा असंवेदनशील मंत्र्यांना आवरले नाही तर भविष्यात काही खरं नाही. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून या सरकारला उलथून टाका आणि शिवस्वराज्य आणा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.


Find out more: