सुपा – मी कुणी कवी नाही, साहित्यिकही नाही. पण साहित्यात एवढी ताकद आहे की माझ्यातील समाजसेवक हा साहित्याने घडवला, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. राळेगणसिद्धी येथे पुस्तक प्रकाशन व काव्य संमेलन पार पडले. त्यावेळी हजारे बोलत होते. हजारे म्हणाले, साहित्यात जीवन परिवर्तनाची ताकद आहे. एके काळी तरुण असताना नैराश्‍यातून मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण विवेकानंदांचे साहित्य वाचले आणि मला जीवनाचा अर्थ समजला.

तेव्हा मी माझ्या समाजासाठी व देशासाठी जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला. म्हणून तर आज देशासाठी थोडेसे काही करू शकलो. संत साहित्याचेही मानवी जीवनात मोठे महत्त्व आहे. मानवी जीवन हे सेवेसाठी आहे. निष्काम भावनेने केलेले कर्म ही खरी ईश्वराची पूजा आहे. हे संत साहित्यानेच शिकवले. आई विषयीच्या कवितांमधून आपल्याला संस्कारांची जाणीव मिळते, अशी भावना हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.

संगमनेर येथील क्रांती राऊत यांच्या साहित्याक्षर प्रकाशनातर्फे कवयित्री रचना यांच्या स्त्री जाणिवा आणि संवेदन या पुस्तकाचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समीक्षक प्रा. अरुण ठोके, साहित्यिक संजय बोरुडे, शब्बीर शेख, डॉ. महेबूब सय्यद, गझलकार शांताराम खामकर, कवी संजय काळे, संजय पठाडे, गणेश भोसले, कारभारी बाबर यांच्यासह अनेक नवोदित साहित्यिक व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

यावेळी राज्यभरातून आलेल्या कवयित्रींचे काव्य संमेलन झाले. यात स्वाती पाटील (कर्जत), वैशाली मोहिते (पुणे), सावित्री जगदाळे (सातारा), श्रावणी बोरगे (नगर), सुनंदा शिंगनाथ (लातूर), अर्चना डावखर (शेवगाव), संगीता गुरव (सातारा), मनीषा पाटील (सांगली), गीतांजली वाबळे (शिरूर) यांनी आपल्या कविता सादर केल्या.


Find out more: