बारामती – धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, तसेच धनगर आंदोलकांवरील खोटे गंभीर गुन्हे मागे घ्या, या धनगर समाजातील युवकांच्या मागणीने सध्या जोर धरला असून राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत एकत्रित लढा देण्याची तयारी आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या राज्यातील तरुणांनी ठेवली आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या संपर्क अभियान लढ्यात तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाजाचे युवानेते किशोर मासाळ यांनी केले आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचा लढा सुरू आहे. बारामती येथे 2014मध्ये धनगर समाजाने ऐतिहासिक मोर्चा काढला तसेच उपोषण देखील केले. भाजप सरकारचे सध्याचे मुख्यमंत्री व त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्‍वासित केले;मात्र त्यानंतर त्यांना धनगर समाजाचा आश्‍वासनाचा विसर पडला त्यामुळे समाजातील युवकांनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलने छेडली.

आंदोलन करणाऱ्या युवकांवर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊन आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली आहे. धनगर समाजाचा रोष परवडणार नसल्याने आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे संघटनात्मक लढा उभा करण्याची गरज असून त्यासाठी मासाळ यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. आंदोलना दरम्यान गुन्हे दाखल असलेल्या तरुणांनी या लढ्यात सहभागी व्हावे, आवाहन मासाळ यांनी केला आहे.


Find out more: