सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यासमवेत पाऊण तास बंद दराआड चर्चा केल्याने राजेंच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र, सातारा शहरात ग्रेड सेपरेटर व कास धरण उंची विकसन प्रकल्प या कामांच्या निधीबाबत चर्चा झाल्याचा अंदाजही व्यक्त होत आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्या मनात नक्की चाललेय काय, यांचा अंदाज राजकीय पंडित लावत होते. साताऱ्यात राजकीय चुप्पी कायम ठेवलेले उदयनराजे भोसले मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांच्याबरोबर कोणीही समर्थक नव्हते. राजेंनी मुख्यमंत्र्यांशी साधारण चाळीस मिनिटे कमराबंद चर्चा केली.
चर्चा मुंबईत झाली आणि त्याची अस्वस्थता साताऱ्यात वाढली. उदयनराजेंचा लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भाजप प्रवेशाचा हुकलेला योग विधानसभेच्या मुहुर्तावर होणार काय, अशा चर्चांनी साताऱ्यात जोर पकडला. कास धरण उंचीच्या अनुदानाला कात्री लागल्याने अडीच महिने काम बंद आहे. मुख्यमंत्र्यांनी अनुदान कपातीचे हत्यार उपसून राष्ट्रवादीचे नाक चिमटीत धरल्याची जोरदार चर्चा आहे. सातारा विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात ग्रेड सेपरेटर व कास धरण उंची विकसन प्रकल्प अग्रक्रमाचे आहेत. रखडलेल्या प्रकल्पाची राजकीय कोंडी फोडण्यासाठी
उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी गुफ्तगू केले. शिवेंद्रराजे यांनी विकास कामांसाठीच भाजप प्रवेश केला आहे. विधानसभेनंतर भाजपच्याच सत्तेची शक्यता गृहित धरली तर आपल्या पुढील राजकीय वाटचालीला अडथळा नको. त्याकरिता सेफ झोन चर्चेचा मार्ग उदयनराजे यांनी स्वीकारल्याचे तर्कवितर्क मांडले जात आहेत. उदयनराजे व मुख्यमंत्री यांच्यातील कमराबंद चर्चा गुलदस्त्यातच आहे .