पाथर्डी  – शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या मोनिका राजळे आमदार आहेत. पुन्हा त्याच आमदार असतील. ज्यांना पक्षात यायचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश करून योगदान द्या, कार्य करा. त्यांचे काम पाहून पुढच्या वेळी त्यांचा विचार करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 25 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत येत असून, बाजार समितीच्या मैदानावर सभा होणार आहे. त्या सभेच्या नियोजनासाठी व भाजप सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून खा. विखे बोलत होते. आमदार मोनिका राजळे, पक्षनिरीक्षक तथा महाजनादेश यात्रेचे समन्वयक प्रसाद ढोकरीकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जि. प. सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, काशिनाथ लवांडे, काकासाहेब शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर आदी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावून चारीचा टप्पा क्रमांक दोन बाबत लक्ष वेधू. राहुरी, नगर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांतील सिंचन क्षेत्र चारीच्या पाण्यावर अवलंबून असून, पाथर्डी तालुक्‍यातील सर्व 102 पाझर तलाव भरून मढी पर्यंत चारीचे पाणी आणण्याची जबाबदारी आपण व आमदार राजळे मिळून पार पाडू.

आमदार राजळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात राज्यावर अनेक संकटे आली मोठी आंदोलने झाली पण अत्यंत खंबीरपणे तोंड देत मुख्यमंत्र्यानी कर्तृत्व सिद्ध केले. रविवारी आयोजित महाजनादेश यात्रेत जनतेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री लोकांशी संवाद साधणार असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.


Find out more: