आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. परंतु, सर्वोच्च न्यायायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत याबाबत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी, असा सल्ला चिदंबरम यांच्या वकीलांना दिला. त्यामुळे आता पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज सकाळी सीबीआयची टीम पोहोचली मात्र, ते घरात उपलब्ध नसल्याने सीबीआयला रिकाम्या हाती परतावे लागले. यामुळे पी. चिदंबरम यांनी देश सोडून जाण्याची दात शक्यता असल्याने ईडीने त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.