मुंबई – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गावे तसेच सातारा जिल्हयातील जावळी, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्‍यांतील भूस्खलन झालेल्या गांवांच्या जमिनींचे शास्त्रीय सखोल परीक्षण करुन आवश्‍यकतेप्रमाणे या गांवांचे पुनर्वसन करावे, कराड विमानतळाच्या विस्तारीकरणात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा आणि महापूराच्या तडाख्यात सापडलेल्या वाडयावस्त्यांचा गावांच्या पुनर्उभारणीसाठी शासनाने नियोजनबध्द कार्यवाही करावी, यासह विविध विषयांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दि. 20 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या समस्यांबाबत कार्यवाही केली जाईल, अशी हमी फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिली.

उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातील माहितीनुसार सातारा तालुक्‍यातील मौजे भवरगड, मोरेवाडी, बेंडवाडी, जावळी व महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील घोटेघर, सुलेवाडी, रांजणी, नरफदेव,मेरुलिंग, दानवली तसेच भिलारचा काही भाग, पाटण तालुक्‍यातील म्हारवंड, जिमनवाडी, बर्गेवाडी, पवारवाडी(डेरवण), विरेवाडी, टोळेवाडी, कजरवाडी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्हयातही भूस्खलन झाले आहे. या ठिकाणी जमिनींना दोन- दोन फूट रुंदीच्या मोठ्या भेगा पडून जमिनी खचल्या आहेत.

याकामी सायंटिफिक मॅनर्सद्वारे जमिनींचे विश्‍लेषण झाले पाहिजे, संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी भूस्खलन झालेल्या गावांचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी खासदार भोसले यांनी केली. कराड विमानतळ विस्तारीकरण विरोध कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक नेते डॉ. भारत पाटणकर यांचेशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन, लोकांना विश्‍वासात घेवून, बाजारभावाप्रमाणे मोबदला देणेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, कराड, नाशिक आदी ठिकाणी महापूरामुळे शैक्षणिक, सांसारिक, व्यावसायिक, व्यापार-उदिम, पशुधन, पिके आदींचे नुकसान झाले.

साथीच्या रोगांचा फैलाव आणि रोगराई पसरण्याचा धोका आहे. महापुरामुळे शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. याकरीता सढळ मदत देण्याबाबत व सक्षम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली. उदयनराजेंच्या सूचनेनुसार योग्य त्या उपाययोजना राबविणेबाबत संबधितांना आदेश देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार भोसले यांच्यासमवेत विनित कुबेर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, नगरसेवक ऍड. डी. जी. बनकर, काका धुमाळ, युवा नेते संग्राम बर्गे उपस्थित होते.


Find out more: