जळोची -संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बारामती तालुक्यातील प्रस्तावित पालखीमार्गाच्या काही गावांतील जमिनींची मोजणी झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्याबाबत नोटिसाही मिळाल्या आहेत, तथापि अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही, त्यामुळे संभ्रमावस्थेत असल्याने त्यांना तातडीने योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन सुळे यांनी ही मागणी केली. बारामती तालुक्यातील उंडवडी, गोजूबावी, कटफळ, एमआयडीसी, वंजारवाडी, रुई, सावळ, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी आदी गावांतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय मोजणी झाली असून संबंधित शेतकऱ्यांना नोटिसाही मिळाल्या आहेत.
या नोटीसांबारोबारच शेतकऱ्यांना लवकरच मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते; परंतु अद्याप मोबदला न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत, ही बाब सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.