पुणे – अद्यापही कोल्हापुरातील पूररेषा बदलली नाही. जी आहे ती 2005च्या पुरावर ठरली. 2005 च्या आधी किंवा नंतर कोल्हापूर महापालिकेत कधीच भाजपची सत्ता नव्हती. त्यामुळे पूररेषेंतर्गत नियमात छेडछाड करून बांधकामांना परवानगी कॉंग्रेसने दिली. केंद्रात, राज्यात आणि कोल्हापूरात त्यांची सत्ता होती. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली, असा आरोप करत कोल्हापूरातील पुराला पुणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कॉंग्रेस सरकारला जबाबदार धरले.पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेत पुण्याच्या प्रश्‍नांसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

3,100 हेक्‍टर क्षेत्र पूररेषेत आल्यानंतर विकसित होणार नाही, असा विषय सध्या पुढे आला आहे. साहजिकच कोल्हापूर महापालिका झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांनी समाविष्ट होण्याला नकार दिला. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ होऊ शकत नाही.

2005 नंतर 15 वर्षांत पूर न आल्याने पूररेषा बदलण्याची मागणी झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली. समितीचा अहवाल येईपर्यंत पूर आला. त्यामुळे आता असा विचार करावालागेल की पूररेषेत बांधकाम करू नये असे नाही तर ते ठराविक उंचीवर आणि ठराविक पद्धतीने करावे असा विचार करावा लागणार आहे. हा ग्रामीण पद्धतीचा उपाय आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

याशिवाय बांधकामे झाली म्हणून पूर आला असे नसते तर पूर आल्यास मालमत्तेचे आणि जीविताचे नुकसान होऊ नये असा त्यामागचा उद्देश असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

…तर मराठवाडा, विदर्भालाही पाणी मिळू शकेल पाऊस जास्त झाला आणि पूरस्थिती निर्माण झाली तर ते जास्त पाणी आजूबाजूचे तलाव भरून घेण्याबरोबरच विदर्भात पाठवण्याची आखलेली योजना निविदा प्रक्रियेपर्यंत आली आहे. ती यशस्वी झाली तर मराठवाडा, विदर्भालाही पाणी मिळू शकेल, असा दावा पाटील यांनी केला.

धरण अभियंत्यांमध्ये भीती सगळ्यात जास्त धरणे महाराष्ट्रात तसेच कोल्हापूर परिसरात आहेत. तेथे पाऊस चांगला असल्याने ती धरणे नेहमीच भरतात. परंतु धरण 70 टक्‍के भरल्यानंतर त्यातील पाण्याचा विसर्ग करावा असा नियम असताना ती धरणे 95 टक्‍के भरल्यानंतर विसर्ग केला जातो. यामागचे कारण पुन्हा पाऊस झाला नाही तर या भीतीचे आहे. त्यालाच तेथील धरणाचे अभियंते घाबरतात. परंतु आता अशी परिस्थिती उद्‌भवेल असा विचार करून धरण 70 टक्‍के भरल्यावर पाणी सोडण्याबाबत कोयना आणि अलमट्टीच्या इंजिनीयर्सना विश्‍वास द्यायला पाहिजे. अलमट्टीमुळेही त्याच्या पुढची गावे बाधित झाली होती, असे पाटील म्हणाले.


Find out more: