आजच्या नव्या भारतात भ्रष्टाचार, घराणेशाही, जनतेच्या पैशांची होणारी लूटमार आणि दहशतवाद यावरील लगाम अधिक घट्ट करण्याचे काम केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे ठामपणे सांगितले. 

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयावर अप्रत्यक्ष भाष्य करताना बुद्ध, गांधी आणि राम-कृष्णाच्या देशात टेम्पररी असे काहीच राहिले नाही. देश आता स्थायी व्यवस्थेच्या दिशेने निघाला असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

दोन दिवसांच्या फ्रान्स दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्समधील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘मोदीऽऽ मोदीऽऽ’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोदींनी भारत आणि फ्रान्समध्ये समान दुवे असल्याचे सांगितले. तसेच आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मोदींनी उपस्थितांसमोर मांडला.

आता नव्या भारतामध्ये थकण्याचा, थांबण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. नवे सरकार स्थापन होऊन फार दिवस झालेले नाहीत. सरकारला अजून 100 दिवस पूर्ण व्हायचे आहेत. मात्र आम्ही स्वागत, सत्कार समारंभ यात न गुंतता थेट काम सुरू केले आहे. स्पष्ट धोरण, योग्य दिशा यांनी प्रेरित होऊन आम्ही एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहोत, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरही हल्लाबोल केला. नवा स्वप्नांचा भारत आता नव्या प्रवासाला निघाला आहे, असेही त्यांनी सांगितले. कलम 370 वर भाष्य करताना मोदी म्हणाले, की भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की, 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, राम-कृष्णाच्या भूमीवरून टेम्पररीला (370 वे कलम) काढता काढता 70 वर्षे निघून गेली. टेम्पररी गोष्ट घालवण्यासाठी 70 वर्षे लागली. त्यामुळे  मला तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते.


Find out more: