
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेते प्रवेश केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा केवळ एक अफवा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी देखील छगन भुजबळ यांच्या सध्याच्या हालचालींवरून भुजबळ हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमधील शिवसैनिकांनी केलेल्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छगन भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत मातोश्री येथे जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त आहे.