जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आठवणीने मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली.
यावेळी गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना हागणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु असे मोदी म्हणाले.
एकीकडे देश पावसाचा आनंद लुटत आहे, तर दुसरीकडे देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सणासुदीची लगबग आहे. दिवाळीपर्यंत देशातील वातावरण असेच राहील, असेही यावेळी मोदी म्हणाले. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट सुरू करण्याची घोषणा यावेळी मोदींनी केली.
तसेच, मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाप्रति असलेली संवेदनशीलता आदी गोष्टींची जगाला ओळख होईल असेही भाष्य त्यांनी केले. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ द्वारे देशवासियांशी तिसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी अन्य अनेक विषयांवर भाष्य केले.