बारामती – अरुण जेटली देशाचे अर्थमंत्री झाल्यावर त्यांनी बारामती भेटीचे निमंत्रण अगत्याने स्वीकारले, बारामतीतील माझ्या गोविंद बाग येथील निवासस्थानी ते राहिले. बारामती कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर बारामतीच्या विकास मॉडेलची त्यांनी दिलखुलास प्रशंसा केली. त्यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण आजही बारामतीकरांच्या स्मरणात असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगून जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शरद पवार यांनी अरूण जेटली यांच्याबाबत फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार म्हणतात की, “भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, याचे मला मनस्वी दुःख होत आहे. ते एक निष्णात विधीज्ञ, अभ्यासू वक्ता, बुद्धिमान अर्थतज्ज्ञ आणि उत्तम संसपटू होते. विरोधी पक्षनेता म्हणून राज्यसभेत कोणत्याही विषयावर सरकारला धारेवर धरताना त्यांच्यातील प्रवाही संवाद कौशल्याने सत्ताधारीदेखील प्रभावित होत. केंद्रीय अर्थमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांच्यातील प्रखर बुद्धिमत्तेची प्रचिती संपूर्ण राष्ट्राला आली.
नोटबंदी सारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक विषयावर अथवा जीएसटी सारख्या जटील विषयावर जेटलींनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली. जीएसटी करप्रणालीतील काही सुधारणा सुचवल्या असता त्यांचे स्वागतही केले. एलजीबीटी सारख्या संवेदनशील विषयावर देखील ते आपली निर्भीड मते व्यक्त करत. केवळ संसदेतील सभागृहच नाही, तर न्यायालय असो वा क्रिकेट अशा कोणत्याही क्षेत्रात त्यांनी आपल्यातील अष्टपैलू गुणांची छाप उमटवली. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. आमचे राजकीय विचार जरी विरोधात असले तरी वैयक्तिक पातळीवर संबंध नेहमी सौहार्दाचे राहिले.