मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्यांना पेव आला आहे. मात्र, याचा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार आणि आदर करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छगन भूजबळ यांना पक्षात कधीच प्रवेश देणार नाही, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले आहे.
नाशिकच्या काही सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीतच उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना पक्षात प्रवेश देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना पक्षात घेतल्यानंतरचे फायदे आणि तोटे यावर चर्चा केली. तसेच भुजबळांनी बाळासाहेबांना दिलेल्या त्रासाची आजही आम्हाला आठवण आहे आणि तो राग अजूनही आमच्या मनात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने भुजबळांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात घेणार नसल्याचे आश्वासन दिले.