जम्मू-काश्‍मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा. तो अधिकार सरकारला आहे. मात्र, विरोधकांना विश्वासात घेऊन बदल करणे आवश्‍यक असते. त्यांना अटक करून किंवा डांबून ठेऊ नव्हे. त्यामुळे देशात अघोषित आणीबाणीपेक्षासुद्धा वाईट स्थिती निर्माण झाली असून भाजप सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

संवाद यात्रेच्या निमित्ताने खासदार सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्यात ओला आणि कोरडा दुष्काळ असताना राज्यातील सरकार मात्र पक्षप्रवेशाचे सोहळे करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट असून नागरिक भीतीच्या आणि चिंतेच्या सावटाखाली आहे. मागील आठवडाभरापासून फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क नाही. त्यामुळे अधीकच चिंता वाढली आहे. अब्दुल्ला कुटुंबियांशी पवार कुटुंबियांचे अनेक वर्षांपासूनचे घरगुती संबंध असून आज अब्दुल्ला कुटुंबीयच नव्हे तर काश्‍मीरमधील जनता भयग्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

ईडी आणि सीबीआय आमचे सरकार असताना माहितीसुद्धा नव्हते. मात्र या सरकारमध्ये नवीन आलेली ईडी आणि सीबीआय ही संस्कृती देशासाठी घातक आहे. या दोन्ही संस्था दबावाखाली काम करत असून केंद्र सरकार या दोन्हींचा गैरवापर करत आहे. ईडी आणि सीबीआयकडून कारवाई होण्याच्या भीतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे नेते भाजप, शिवसेनेत सामील होत आहेत. परंतु पक्ष सोडून जाणारे पुन्हा परतणार असतील तर त्यांना क्‍यूमध्ये थांबावे लागेल.


Find out more: