सोलापूर : राष्ट्रवादीला सुरुंग; आमदार सोपल शिवसेनेत

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसला एका मागून एक धक्के सुरूच आहेत. अनेत दिग्गजांनी भाजप, सेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लागला आहे. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल यांच्यानंतर सोपल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मोठे गडाला भगदाड पडले आहे. 

बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आज, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. दिलीप सोपल यांच्या या निर्णयामुळे सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत.

सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता. कार्यकर्त्यांची मते आजमाविल्यानंतर त्यांनी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला. बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल शिवसेनेचा मार्ग स्वीकारतील असे बोलले जात होते. ही चर्चा आता खरी ठरली आहे. 

सोपल हे उद्या, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तर २८ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल शिवबंधन बांधून घेणार आहेत. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांच्या खेळीने माजी आमदार राजेंद्र राऊत यांची कोंडी झाली आहे. 

राजकारणातील वाऱ्यांचा अंदाज घेऊन दिलीप सोपल हेही शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा काही महिन्यांपासून होती. सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

'शिवसेनेत प्रवेश करावा, अशी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा असल्याने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिलीप सोपल यांनी सांगितले.


Find Out More:

Related Articles: