नवी दिल्ली : आयएनएक्स मीडीया घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी दिले. दरम्यान, हवाला व्यवहाराप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायमूर्ती आर. बानूमती आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.
आयएनएक्स मीडीया घोटाळाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्यानंतर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता तर तुम्हाला सीबीआयने अटक केलेली आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही दाखल केलेला अर्ज निष्फळ असून नियमित जामिनासाठी संबंधित न्यायालयात नव्याने याचिका दाखल करा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सोमवारी सकाळी दिला. दुसरीकडे चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सीबीआय न्यायालयाने चिदंबरम यांची कोठडी चार दिवसांनी वाढवली.
गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला गेल्यानंतर सीबीआयने अत्यंत नाट्यमयरित्या चिदंबरम यांना त्यांच्या जोरबाग येथील घरातून अटक केली होती. चिदंबरम यांना अटक झाली असली तरी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अटकेपूर्वी दाद मागण्यात आली होती. परिणामी आपल्या अशिलाची बाजू ऐकून घेतली जावी, असा युक्तीवाद चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. यावर न्यायमूर्ती बानूमती यांनी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केलेली असल्याने नियमित जामिनासाठी संबंधित न्यायालयातच तुम्हाला दाद मागावी लागेल, असे स्पष्ट केले.
मागील पाच दिवसांत सीबीआयने चिदंबरम यांच्याकडून ठोस असे काही पुरावे मागितलेले नाहीत. विदेशात बँक खाती आहेत काय, अशी त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली, त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिल्याचे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. चिदंबरम यांचे सोशल मीडीयावर खाते आहे काय, अशी विचारणा तपास अधिकार्यांनी केली होती. यावरून तपासातली गंभीरता दिसून येते, असेही सिब्बल म्हणाले. तपास संस्थांच्या ताब्यातील काही कागदपत्रे प्रसारमाध्यमात लिक करून चिदंबरम यांची मीडीया ट्रायल घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. तपास अधिकार्यांनी चिदंबरम यांचे विदेशात एकजरी बँक खाते वा संपत्ती असल्याचे दाखवून दिले तर आपण खटल्यातून अंग काढून घेऊ, असेही ते म्हणाले.