
नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर कलम 370 हटण्याच्या मुद्यावरून टीकास्र सोडले आहे. त्यांनी म्हटले की, तुम्ही राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबत आहात. यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही नसू शकते. तुम्ही स्वतः जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहात आणि आरोप मात्र विरोधकांवर लावत आहात, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
असे हे किती काळ चालू राहिल? “राष्ट्रवादा’च्या नावाखाली मौन पाळल्या गेलेल्या कोट्यवधी लोकांपैकी हे एक आहे. काश्मीरमधील सर्व लोकशाही हक्कांवर गदा आणली जात आहे. या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्हीला यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे एका ट्विटर युजरच्या ट्विटला री-ट्विट करताना म्हटले आहे. या यूजरने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक महिला विमानात राहुल गांधींना काश्मीरच्या सद्यस्थितीबाबत सांगताना रडत असल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या 12 नेत्यांना शनिवारी श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले होते. राहुल गांधी कलम 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा व तेथील स्थानिकांची भेट घेऊ इच्छित होते. मात्र त्यांना अडवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधींनी ट्विटद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरलतसेच, नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते श्रीनगर विमानतळावर अधिकाऱ्यांना विचार आहेत की, जम्मू-काश्मीरच्या लोकांशी आम्ही का भेटू शकत नाही?, जर जम्मू-काश्मीरमधील वातावरण सामान्य आहे तर मग आम्हाला का अडवले जात आहे? तसेच, आम्ही या ठिकाणी राज्यपालांच्या बोलावण्यावरून आलो असल्याचेही राहुल गांधी या व्हिडिओत अधिकाऱ्यांना सांगत असल्याचे दिसत आहे.