मुंबई - मुंबईतील ईडी कार्यालयाचा इंग्रजी व हिंदीमध्ये असलेला फलक मराठीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने तसे मुंबई महापालिकेला पत्र देऊन लक्ष वेधले आहे. याबाबत येत्या काही दिवसात मनसेकडून त्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

दादर येथील कोहिनुर मिलच्या खरेदी विक्रीबाबत ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली.या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला होता. राज ठाकरे यांची ज्या ईडी कार्यालयात चौकशी झाली, त्या कार्यालयाबाहेरील फलक मराठीत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा फलक मराठीत लावावा अशी मागणी मनसे कडून करण्यात आली आहे.

मनसेचे कुलाब्याचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी पालिकेच्या फोर्ट येथील ‘ए’ विभाग कार्यालयाला तसे पत्र देऊन मराठीत फलक लावावा अशी मागणी केली आहे. या पत्राची प्रत मुंबई शहर जिल्हाधीकारी कार्यालय तसेच ईडी कार्यालयाही देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे. मराठी भाषेची काटेकोर अंमलबजावणी केली जावी म्हणून राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार केंद्रीय कार्यालयातही मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या फलकावर मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. संबंधित कार्यालयाला तशा सूचना कराव्यात व कारवाईचे उत्तर लेखी स्वरूपात द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

मनसे आक्रमकईडीच्या चौकशीनंतर मनसेचा आक्रमकपणा कमी होईल, असा अंदाज होता. परंतु, ईडी विरोधात पत्र पाठवून मनसेने त्यांच्या अंगभुत शैलीनुसार शिंगावर घेण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. राज यांची ईडीची अद्याप चौकशी संपलेली नाही. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने असे पत्र पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Find out more: