पुणे -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. आघाडीमध्ये शहरातील कुठलेही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आले तरी सर्वच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि खासदार वंदना चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे उपस्थित होते.
पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी सोमवारी दिवसभर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी, विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. पक्षाची बूथ लेव्हलपर्यंतची बांधणी पूर्ण झाली असून बूथ लेव्हलच्या कामांना गती देण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आले आहेत, असे तुपे आणि चव्हाण यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी आहे. शहरातील आठपैकी चार विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. जागा वाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, पूर्वीप्रमाणेच हे जागा वाटप होईल, अशी शक्यता आहे. परंतु वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, त्यानुसारच पुढील दिशा स्पष्ट होईल. परंतु, आघाडीच्या उमेदवारांसाठी आठही मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आम्ही त्याला गती दिली आहे, असेही चव्हाण आणि तुपे यांनी नमूद केले.