विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या राजकीय यात्रा आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. तर सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर तुटून पडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेने चांगलेचं लक्ष्य केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या यात्रेतून फैलावर घेत आहेत. बीडच्या यात्रेत फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आपल्या सभेतून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे जोरदार भाषणे करत आहेत, ते ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नसल्याचा खोचक टोला फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. तसेच धनंजय मुंडे मला आमने – सामने येण्याचे आव्हान करत आहेत. मात्र त्यांना आमचे सुरेश धसचं मुंडेंना पुरून उरतील,आधी त्यांचाशी सामना करून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.तर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री हे खोटी आकडेवारी देत असल्याचा आरोप केला होता. त्यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आकडेवारी खोटी ठरली, असे गेल्या वीस वर्षात आत्तापर्यंत कधीचं घडलं नाही, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणुक इव्हीएमवर झाली. तेव्हा विरोधकांच सरकार सत्तेवर होत. तेव्हा इव्हीएममध्ये कोणताच दोष नव्हता. मात्र मोदी सरकार येताच इव्हिएम हे खराब झाले. मात्र इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत. त्यमुळे ते आता जनतेतून नेस्तनाबूत होत आहेत, असा टोला मुख्यमंत्री यांनी लगावला.