विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याचं पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून राज्यात यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समावेश आहे. महाजनादेश यात्रा बीड येथे आली असता बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीची घोषणा कधीही होऊ शकते असे म्हटले आहे.
तसेच फडणवीस बोलताना पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजप शिवसेना युती कधी झाली हे माध्यमांना कळले सुध्दा नाही. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा कधी होईल हे पण कळणार नाही. एका दिवसात अचानक कधीही आम्ही युतीची घोषणा करू असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.तसेच मराठवाड्यातील दुष्काळावर बोलताना, दुष्काळाच्या उपाययोजना आम्ही करत आहोत. मराठवाडा वॉटर ग्रीड ही एक महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे दुष्काळावर मात करता येणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान बीड जिल्हा वॉटर ग्रीडलाही आपण मान्यता दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कोकणात वाहून जाणारं १६७ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यात सोडून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेतून काम झालं. यावर्षी जी काही पिकं दिसत आहेत ती या योजनेमुळेच, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितले.