विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातल्या नेत्यांनीच पवारांची साथ सोडली आहे. तर आता भाजपात पुन्हा एकदा मेघाभरती होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या महा जनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सोलापुरात संपणार आहे. या समारोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये मेघाभरती होणार असल्याचं सांगितल जात आहे.
1 सप्टेंबरला सोलापूरात आणि 5 सप्टेंबरला मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले 5 दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावांची जोरदार चर्चा असून या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय.
दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशावरून अजूनही संभ्रम आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाही. त्यामुळे राजेंचा भाजप प्रवेश होणार का ? हे अजून निश्चित झालेलं नाही. मात्र राजे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याने ते पक्ष सोडतील असं बोललं जात होतं. जे काम काँग्रस-राष्ट्रवादीनं केलं नाही ते काम भाजपने केलं असं सांगत उदयनराजेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं.