आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघाचे प्रमुख दावेदार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आपल्या समर्थक २० नगरसेवकांसह एमआयएम पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावच्या मुशावर्त चौकात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
संसदेत पारित झालेल्या तीन तलाकच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका न घेतल्याने मौलाना मुफ़्ती मोहम्मद इस्माइल यांनी २० नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तातडीने हज यात्रेसाठी रवाना झाले होते. हज यात्रेवरून मालेगावात परतले. मालेगावमध्ये दाखल होताच मुफ्ती यांनी एमआयएममध्ये प्रवेश घेतला. मौलाना मुफ़्ती यानी एमएएममध्ये प्रवेश घेतल्याने मालेगावात पक्षाची ताकद वाढली आहे.
दरम्यान, यापूर्वी वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणा जगजीत हेही पक्ष सोडणार आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.