आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कांबळे यांनी काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असून, त्यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचंं कळतं आहे.

मुंबईत ४ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.भाऊसाहेब कांबळे यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.                                                                                          




Find out more: