विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, तत्पूर्वी सत्ताधारी भाजप – शिवसेनेकडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याची स्पर्धा सुरु आहे. श्रीरामपूरचे कॉंग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान कांबळे यांना पक्ष प्रवेश देण्यासाठी शिवसेनेन हायटेक यंत्रणा राबवल्याचं दिसत आहे.

भाऊसाहेब कांबळे यांनी रविवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली, यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना नेते सचिन बडधे उपस्थित होते. पक्ष प्रवेश करण्यापूर्वी नियमाप्रमाणे कांबळे यांना राजीनामा देणे गरजेचं असल्याने हरिभाऊ बागडे यांची भेट घेण्याचे निश्चित झाले, मात्र बागडे हे पुण्यामध्ये होते.

पुढे ते चार दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची माहिती शिवसेना नेत्यांना मिळाली. त्यामुळे तात्काळ त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कांबळे यांना चार्टड विमानाने पुण्याला पाठवले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील कांबळे यांच्या समवेत उपस्थित होते.

दरम्यान, कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना होमपिचवर दणका बसला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनाही धक्का बसला आहे. श्रीरामपुरच्या जागेसाठी खा लोखंडे हे आपल्या मुलासाठी तर आ. दराडे हे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व येवला बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.

Find out more: