भ्रष्टाचार होऊ न देण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. पण जेव्हा प्रशासकीय अधिकारीच स्वतःची झोळी भरण्यास सुरु करतात तेव्हा भ्रष्टाचाराची कीड कशी पसरत चालते, त्याचं उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळतंय. धान्य घोटाळ्यात भ्रष्टाचार प्रकरणी एक उपजिल्हाधिकारी सीआयडीच्या रडारवर आहे, तर आता दुसऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्यानेही नवा प्रताप केलाय. हस्तकामार्फत दोन लाख रुपयाची लाच घेणाऱ्या या उपजिल्हाधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने गुन्हा दाखल केलाय.
भ्रष्टाचारात कायमच अग्रेसर मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात ही कीड काही प्रमाणात कमी झाली असल्याचा दावा केला जातो. पण हा दावा वारंवार खोटा ठरतोय. कारण, अगोदरच धान्य घोटाळ्यात महसूलचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर सीआयडीच्या रडारवर आहेत. पुन्हा एक नवं प्रकरण समोर आलंय.
नांदेड जिल्ह्यातील नद्यामधली रेती म्हणजे कमाईचे साधन बनली आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील ट्रक सोडून देण्यासाठी बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोल भोसले यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी लाचेची ही रक्कम हस्तकामार्फत स्वीकारली. एसीबीने लाच घेणाऱ्या व्यक्तीला अटक केली. मात्र उपजिल्हाधिकारी अमोल भोसले यांना या प्रकाराची कुणकुण लागल्याने ते गायब झाले आहेत.
थेट उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याविरोधात लाचेची मागणी करणे आणि ती स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या प्रकारामुळे नांदेडच्या महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी भोसले हे नव्यानेच नोकरीला लागले होते. अधिकची कमाई करण्याचा त्यांचा मोह चांगलाच नडलाय.
दरम्यान, अन्नधान्याअभावी कोणताही गरीब उपाशीपोटी झोपू नये यासाठी सरकारने अन्न धान्य सुरक्षा योजना आणली. मात्र आपल्या भ्रष्ट डोक्याचा वापर करत या योजनेचा बट्याबोळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील याच योजनेतील कोट्यवधी रुपयांचे धान्य काळ्या बाजारात विकताना पोलिसांनी जप्त केलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात घडलेला हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न देखील दोषी मंडळींनी केला. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्याने या घोटाळ्यातील बडे मासे उघडे पडत आहेत.
उच्च न्यायालयाने नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अटक करावेस असे आदेश सीआयडीला दिले आहेत. त्यानंतर लगेच बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोल भोसले लाचखोरीच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे नांदेडच्या महसूल प्रशासनाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड हटवणं अत्यावश्यक बनलंय.
उपजिल्हाधिकारी या स्तराचा अधिकारी होण्यासाठी एमपीएससीचा कठीण अभ्यास करुन उमेदवार यश मिळवतात. प्रत्येक जण काही तरी स्वप्न घेऊन अधिकारी होतो. पण ही परीक्षा पास होण्यासाठी मिळवलेलं ज्ञान, केलेला अभ्यास हे पुस्तकीच राहत असल्याचं या दोन उदाहरणांनी दाखवून दिलंय.