जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून चांगलाच तांडव करण्यात आला होता. परंतु, केलेल्या तांडवाने पाकलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडावे लागले. तसेच जगातील चीन सोडून कोणत्याही देशाने पाकला साथ दिली नाही. दरम्यान, यासर्व परिस्थितीमध्ये आता पाकिस्तानने सावध भूमिका घेतली आहे.
भारताविरुद्ध भविष्यात पाकिस्तान कधीही युद्ध सुरू करणार नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. लाहोरमध्ये शीख समुदायाच्या एका कार्यक्रमात इम्रान खान बोलत होते.
पकिस्तानने भारतासोबत भविष्यातील युद्धाची शक्यता फेटाळून लावली आहे. याविषयी बोलताना इम्रान यांनी, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत. दोन्ही देशांमध्ये कितीही तणावाचे वातावरण निर्माण झाले तरी आम्ही युद्ध पुकारणार नाही, कारण युद्धाचा दोन्ही देशांना धोका आहे.
त्यामुळे पाकिस्तान भारताविरुद्ध कधीही युद्ध सुरू करणार नाही असे म्हटले. तसेच युद्ध हे कोणत्याही समस्येचे निराकरण असू शकत नाही. युद्धात दोन्ही देशांना धोका असतो, युद्ध जिंकणारा देशदेखील खुप काही गमावून बसतो, युद्धानंतर देशात नव्या समस्यांचा जन्म होतो त्यामुळे युद्धाला पाकिस्तान आता किंवा भविष्यात कधीही प्राधान्य देणार नसल्याचे खान यांनी म्हटले.