काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वधेरा यांनी आर्थिक मंदीवरून केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचे सरकारने मान्य करायला हवे असे, त्यांनी म्हटले आहे. ट्विटद्वारे त्यांनी मंदीबाबत भाष्य केले आहे.
प्रियंका म्हणाल्या, की कोणतेही खोटे शंभरवेळा सांगितल्याने ते खरे होत नाही. भाजप सरकारला आता हे मान्य करायला हवे, की अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे.
मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहात, असा सवाल त्यांनी केला.दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकित केले होते.
याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असे म्हटले होते. मंदीला त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची घाईगडबडीत केलेली अंमलबजावणीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीचा) पाच टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील सर्वाधिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.