दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार अलका लांबा या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.

अनेक महिन्यांपासून त्या पक्षावर आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत.पुढच्या वर्षी 2020 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2015 मध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्ष पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये लांबा यांनी आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केले होते.

तसेच आगामी निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे म्हटले होते. यावर पक्षानेही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले होते; मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्याने पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरील जनतेचा विश्‍वास कमी झाल्याचे लांबा यांनी म्हटले होते.

त्यानंतर त्यांना पक्षाच्या सभासदांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते.दरम्यान, नाराज असल्याने लांबा यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासही नकार दिला होता. एप्रिल महिन्यांत लांबा आणि आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांच्यासोबत ट्विटरवरून खडागंजी झाली होती. या वेळी भारद्वाज यांनी लांबा यांना टोमणे मारत पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.

Find out more: