राहुरी – आमचे ठरले आहे. आमदार शिवाजी कर्डिले आणि लोकसभेत डॉ. सुजय विखे पाटील प्रतिनिधित्व करतील. विखे कर्डिले युती विकासासाठी असून ती अतूट असल्याची ग्वाही आमदार शिवाजी कर्डिले व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
काल राहुरीत आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. आ.कर्डिले अध्यक्षस्थानी होते. भैय्यासाहेब शेळके मित्रमंडळ, तालुका विकास मंडळ, परिवर्तन आघाडी व डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम झाला. खा.डॉ. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोणी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी आमदार कोण होणार हे विखे ठरविणार आहेत. पक्षात प्रवेश केला म्हणजे आमदार झालो असे कोणीही समजू नये.
दोन दिवसापूर्वीची माझी भाषणे ऐकली असती तरी मला भाजपचा उमेदवार म्हणून मते मिळाली नसती. ऐनवेळेस या पक्षात येवून निवडून येथे सोपे नव्हते. केवळ जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कोण करते, हे माहिती असल्यानेच हा विजय मिळाला. मी सूडाचे व उधारीचे राजकारण करीत नाही. हिशोब पूर्ण करतो. आ. कर्डिले ना विरोध करुन मी कोणाला आमदार करणार त्यामुळे हा संशय कार्यकर्त्यांनी काढून टाकावा. नगर ते पुणे एक्सप्रेसचे सर्वेक्षण सुरु झाले असून त्यामुळे नगर ते पुणे हे अंतर दोन तासात पार करता येईल.
आ. कर्डिले म्हणाले, खासदार बाळासाहेब विखे यांच्यापासून माझे विखें घराण्याशा संबध आहेत. मी त्यांच्याच बरोबरीने काम केले आहे. ही युती विकासासाठी असून मतदारसंघातील राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करू. निळवंडेचे पाणी येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचेल.
भागडाचारी, वांबोरीचारीचे विषय मार्गी लागले आहेत. महंत उध्दवजी महाराज मंडलिक यांचे यावेळी भाषण झाले. विकास मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी प्रास्तविक केले. कारखाना उपाध्यक्ष श्यामराव निमसे, डॉ. सुभाष पाटील, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, सुरसिंग पवार, उत्तमराव म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.