राज्यातील 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. मोगलांना जे जमले नाही, ते राज्य सरकार करत आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, मोगलांना जे जमले नाही, ते राज्य सरकार करत आहे. राज्यातील 25 गड, किल्ल्यावर हॉटेल, लग्न कार्यासाठी डेस्टिनेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. महाराष्ट्रची संस्कृती बदलण्याचे पाप भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. याला अटकाव केला पाहिजे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे पापही या सरकारने केले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच इंदापूर जागेचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात पातळीवर होणार असल्याचे ठरले होते. त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसवर रोष व्यक्त करत आहेत, हे दुर्दैवी आहे,असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु आहे. या बैठकीत शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक, शशिकांत शिंदे, फौजिया खान, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेत्यांनी हजेरी लाली आहे.