छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी संबंधित आहे, अशा कोणत्याही किल्ल्याला नखभरही हात लावू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील किल्ले लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाणार आहेत, अशा बातम्या माध्यमांतून प्रसारित होताच यावरून सत्ताधारी पक्षावर चौफेर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भुमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री म्हणाले, “ज्या किल्ल्यांना इतिहास नाही, त्याच किल्ल्यासाठी हा निर्णय लागू असून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी संबंधित आहे अशा एकाही किल्ल्याला नखभर देखील धक्का लागू देणार नाही. या निर्णयाबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत.” पुण्यातील मानाचा केसरीवाडा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, “माध्यमांतून प्रसारित झालेल्या बातम्या अतिशय चुकीच्या आहेत. याबद्दल स्वतः पर्यटन मंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देले आहे. पहिली गोष्ट हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचा मराठ्यांचा जो काही इतिहास आहे. याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही. कारण, हे सर्व संरक्षित किल्ले आहेत.

उलट, आमच्या सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारे विकासकामे केली आहेत. तशी यापूर्वी कुठल्याही सरकारने केलेली नाहीत, त्याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. यासाठी छत्रपती संभाजी राजेंचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः लक्ष घातल्याने आज ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. तशाच प्रकारे इतिहास आम्हाला जतन करायचा आहे.”

“त्यामुळे किल्ल्यांसंदर्भातला जो काही निर्णय झाला आहे तो सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे २०० ते ३०० कुठलाही इतिहास अस्तित्वात नसलेले आणि केवळ चार भिंती असलेले किल्ले आहेत त्यांच्यासाठी आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, असा हा निर्णय आहे. याचा उद्देश तिथे कुठले लग्न समारंभ किंवा इतर समारंभ करायचे असा नाही,” असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


Find out more: