राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वशीकरणाची विद्या आहे. याच वशीकरण मंत्राचा वापर करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी उधळली आहेत. ते शुक्रवारी जळगावमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. 

डॉ. सतीश पाटील हे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश पाटील यांनी जाहीरपणे अंधश्रद्धेचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे.

त्यांनी म्हटले की, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. त्याद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना वश केले आहे. त्यामुळेच गिरीश महाजन दावा करतात ती प्रत्येक गोष्ट खरी ठरते, असे अजब तर्कट सतीश पाटील यांनी मांडले. 

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर गिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. अनेक महत्त्वाचे निर्णय आणि आंदोलनांमध्ये गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने मध्यस्थीचे काम पार पाडले होते. याशिवाय, सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या आयातीमध्येही गिरीश महाजन यांची मुख्य भूमिका आहे.                                                                                      


Find out more: