महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचीच असेल आणि रिपब्लिकन पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणू, ही काळ्या दगडावरची रेख आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वरळी येथे आठवले गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधक आम्ही भारतीय संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत. पण त्यांच्या म्हणण्यात काडीचेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप शिक्षण व नोकर्‍यातील आरक्षण घालवणार, देशाची राज्यघटना बदलविणार ही टेप विरोधकांनी आता बंद करायला हवी, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लगावला.

चैत्यभूमीवरील इंदू मिलच्या जागेवरील जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नजीकच्या काळात होईल. ते जगभरातील लोकांचे आकर्षण राहील. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या आणखी विकासासाठी मोठा निधी देण्यात आला असून, सरकार राबवीत असलेल्या अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितल्या. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी विधानसभेच्या 10 जागांची मागणी केली.

भाजप-शिवसेना व मित्रपक्षांची महायुती होईल तसेच या महायुतीच्या एकूण 235 जागा निवडून येतील, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे व रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आजच्या मेळाव्याला रिपाइंने निमंत्रित केले होते. मात्र ते या कार्यक्रमास हजर नव्हते. युतीमधील जागावाटपाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी या मेळाव्यास येण्याचे टाळले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Find out more: