तिहार कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी धार्मिक पुस्तकांचे वाचन सुरू केले आहे. नाश्त्याला त्यांना सकाळी सहा वाजता चहा, दूध व लापशी-खिचडी देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर त्यांनी तुरुंगाच्या आवारात फेरफटका मारला. त्यांना तुरुंग क्रमांक 7 मध्ये ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी पुत्र कार्ती चिदंबरम यांनी त्यांची भेट घेतली. तेथे सक्तवसुली संचालनालयाच्या प्रकरणातील आरोपींना ठेवले जाते. माजी अर्थमंत्री व गृहमंत्री असलेल्या चिदंबरम यांना गुरुवारी आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यांच्या वकिलांनी दुपारी त्यांची भेट घेतली.
तुरुंगातील वाचनालयात जाण्याची व काही काळ टीव्ही पाहण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात ठेवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात आणले जाणार असल्याच्या शक्यतेने आधीच पूर्वतयारी करण्यात आली होती. न्यायालयातून त्यांना तुरुंगात आणण्यास 35 मिनिटे लागली.
दरम्यान, तिहार तुरुंगात सध्या 17400 कैदी असून त्यातील 14000 कच्चे कैदी आहेत. याआधी तिहार तुरुंगात संजय गांधी, जेएनयू नेता कन्हैय्याकुमार, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, उद्योगपती सुब्रतो रॉय, छोटा राजन, चार्ल्स शोभराज, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांना ठेवण्यात आले होते. निर्भयाकांडातील आरोपीही तिहार तुरुंगात आहेत.