आजच्या घडीला देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही 21 व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपले सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक पायाभूत सुविधांवर शंभर लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मुंबईतील तीन नव्या मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजनाच्या वेळी मोदी बोलत होते.
मुंबईत आल्यानंतर मोदी यांनी सर्वप्रथम विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन केले. गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो 10 (9.2 किलोमीटर), वडाळा-सीएसटी मेट्रो 11 (12.8 किलोमीटर) आणि कल्याण-तळोजा मेट्रो 12 (20.7) या प्रकल्पांचा समावेश आहे. या वेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो कोचचेही उद्घाटन करण्यात आले.
मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कौतुक केले. या वेळी मोदी यांनी ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.फडणवीस यांनी मोदी यांचे कौतुक केले. देशापासून काश्मीरला वेगळे करण्याचा काही जण प्रयत्न करत होते; पण तुम्ही कलम 370 रद्द करून त्यांना रोखले. काश्मीर आणि श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात, असेही ते म्हणाले.
तुमच्या नेतृत्वात चाँद जिंकला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे ठाकरे यांनी मोदी यांचे कौतुक केले. सत्तेत आल्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली. देशाला दिशा दाखवणारे मोदी यांचे नेतृत्व आहे. मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास आहेच. समान नागरी कायदादेखील तुम्ही आणाल हा देखील विश्वास आहे, असे ते म्हणाले.