महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीतही सत्ता भाजपकडेच राहिल, असा दावा केला आहे.
सरकार भाजपचंच येणार आहे हे शरद पवारांना सांगा. ते अजूनही विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत आहेत, असाही टोला पाटील यांनी पवारांना लगावला. ते बारामतीत भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभेतील पराभवाने नाउमेद न होता 2024 ची निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांनाही आपलं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर हे पवारांनाही सांगा. पवारांना आजही विधानसभेत सत्ता येईल असंच वाटत आहे, असा टोला पवारांना लगावला.
लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत शरद पवार यांना बारामतीच्या निकालाची शाश्वती नव्हती. निकालात काही गडबड होते का अशीच शंका त्यांना होती. इतकी निकराची लढाई भाजपनं या मतदारसंघात केल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं. लोकसभेच्या निकालानं नाउमेद न होता कुठे कमी पडलो, आता पुढे काय करायचे याचा विचार करून 2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.